(११ जुलै १९२१ - ९ एप्रिल २००१ )
नवयुग १९५७-५८ च्या दिवाळी अंकात त्यांची ‘माणुसकीची हाक’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली आणि खरातांच्या कादंबरी लेखनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेव्हापासून अखेरपर्यंत त्यांचे कादंबरी लेखन अव्याहत सुरू होते. त्यांच्या कादंबर्यांचे विषयही उपेक्षित समाज, भटके, गुन्हेगार, झोपडपट्टी व वकिली व्यवसाय ह्यांवर आधारित असेच आहेत.त्यांनी विपुल वाङ्मय-निर्मिती केली.
त्यांचे चरित्रबंधात्मक लिखाण म्हणजे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा हे ग्रंथ होत.
बाबासाहेबांचे युयुत्सू व्यक्तिमत्त्व, त्यांची समाजनिष्ठा, समता-स्वातंत्र्य मूल्यावरील विश्वास, त्यांचे मानव-मुक्तीचे प्रयत्न यांचा वेध यातून घेतला आहे. तर ‘अस्पृश्यांचा मुक्तिसंग्राम’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर’, ‘आज इथं उद्या तिथं’, ‘दलित साहित्याचे वेगळेपण’, ‘महारांचा इतिहास’, ‘भटक्या-विमुक्त जमाती व त्यांचे प्रश्न’ असे दर्जेदार वैचारिक लेखनही त्यांनी केले. यामागे सखोल अनुभवांचा आधार आहे, सामाजिक तळमळ आहे. त्या तळमळीतून व आंबेडकरी निष्ठेतून बाबासाहेबांच्या पत्रांचे संपादनही त्यांनी केले.
१९८४ साली संपन्न झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद खरात यांनी भूषविले आहे.
( संदर्भ - महाराष्ट्र नायक, डॉ वासुदेव डहाके)