( ५ जानेवारी १९२५ - १९ जुन १९९८ )
विनोदी लेखक, प्रवासवर्णनकार, कथाकार म्हणून मराठी साहित्यात स्वतःचे स्थान निर्माण करणारे रमेश मंत्री १९५८ साली अमेरिकन सरकारच्या माहिती खात्यात अधिकारी या नात्याने ते वास्तव्यासाठी अमेरिकेत गेले. १९७८ सालापर्यंत ते तिथे होते. त्या काळात देश-विदेशांत त्यांचा भरपूर प्रवास झाला. त्या प्रवासातील अनुभवांवर त्यांनी प्रवासवर्णने लिहिली.
त्यांच्या लेखनाचा झपाटा वाखाणण्याजोगा होता. १९७९ साली एकाच वर्षात ३४ पुस्तके लिहिण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.रमेश मंत्री यांच्या नावावर १३०हून अधिक पुस्तके आहेत. त्यांतली बरीचशी प्रवासवर्णने व विनोदी पुस्तके आहेत.
विनोदी फॅण्टसी हा सर्वस्वी नवा साहित्यप्रकार त्यांनी मराठी वाङ्मयात रूढ केला. त्यातूनच जेम्स बॉण्डच्या धर्तीवर जनू बांडे ही विडंबनात्मक व्यक्तिरेखा त्यांनी निर्माण केली.मुंबई मराठी साहित्य संघात ‘साहित्यिक गप्पा’ हा अतिशय अभिनव कार्यक्रम सुरू करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. १९९२ सालच्या कोल्हापूरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्या वेळी अध्यक्षपदावरून सोडलेल्या संकल्पाच्या पूर्तीसाठी त्यांनी गावोगावी पुस्तकांची प्रदर्शने भरवली. त्यांनी लेखकांच्या भाषणांचे ९५ कार्यक्रम वर्षभरात घडवून आणले. ‘वाचन-संस्कृती’ वृद्धिंगत करण्याचे त्यांचे हे काम महत्त्वाचे होते.
( संदर्भ - महाराष्ट्र नायक, सविता टांकसाळ)