(२८ मार्च १८६८ — १८ जून १९३६ ).
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रशियन लेखक. मूळ नाव अल्यिक्स्येई मक्स्यीमव्ह्यिच प्येश्कॉव्ह. पूर्ववयातील कडवट अनुभवांमुळेच त्यांनी गॉर्की ( कटू किंवा दुःखी) हे नाव घेतले. ‘Makar Chudra’ ( १८९२ ) ही कथा लिहून त्यांनी लेखनक्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्या प्रारंभीच्या कथांत समाजाच्या खालच्या थरातील उनाड, भटके, गुन्हेगार आदींचे सहानुभूतिपूर्वक चित्रण केले. हे लोक शूर व ध्येयनिष्ठ असतात ही त्यांची धारणा होती. समाजातील कनिष्ठ श्रेणीतल्या घटकांना ते ध्येयवादी रूप देत होते. त्यानंतरच्या काळातल्या त्यांच्या कथा भौतिकवादी आहेत. १८९९ ते १९१० ह्या काळात गॉर्कीने कथांबरोबरच काही कादंबऱ्या आणि नाटके लिहिली. द मदर, (१९२९) ही त्याची सर्वोत्कृष्ट कादंबरी ह्याच काळातली.
मराठीत आई ह्या नावाने ही कादंबरी विनायक महादेव भुस्कुटे ह्यांनी अनुवादिली आहे . क्रांतिकार्यावरील निष्ठा, तरुण क्रांतिकारकांचा मिळालेला सहवास आणि मान ह्यांमुळे एका भित्र्या, दडपलेल्या स्त्रीचे कोमल, ममताळू आणि निर्भय स्त्रीत कसे रूपांतर होते, त्याचे चित्र या कादंबरीत रंगविलेले आहे. ही कादंबरी समाजवादी वास्तववादाचा महान आदर्श म्हणून रशियन टीकाकारांनी गौरविली. Zhizn Klima Samgina (लेखनकाल १९२७ ते १९३६ ) ही त्याची चार खंडात्मक कादंबरी विशेष उल्लेखनीय आहे. ह्या कादंबरीत झारच्या कारकीर्दीत वाढलेली जुनी पिढी आणि बोल्शेव्हिक विचारांनी भारलेली नवी पिढी ह्यांच्या संघर्षाचे चित्रण आहे. या कादंबरीचे चार खंड बायस्टँडर ( १९३० ), द मॅग्नेट (१९३१), अदर फायर्स (१९३३) आणि द स्पेक्टर (१९३८) ह्या नावांनी अनुवादित झालेले आहेत. रशियाबाहेरचे टीकाकार गॉर्कीला एकोणिसाव्या शतकातील वास्तववादाचे शेवटचे प्रकरण म्हणून संबोधतात.
( संदर्भ - मराठी विश्वकोश, कुमुद मेहता)