( २९ डिसेंबर १९०८ - २० जुन १९९७ )
यवतमाळ जिल्हा न्यायालयात पूर्णवेळ वकील म्हणून ते काम करत असायचे. फौजदारी खटल्यांमध्ये ते कायम जिंकत असायचे त्यामुळे त्यांचं बरंच नाव झालं होतं. पुढे दृष्टिदोषामुळे त्यांनी त्यांना वकिली सोडावी लागली. पण वाचन आणि अध्ययन चांगलं असल्याने ते कविता वैगरे प्रकाराकडे वळले. यात त्यांनी नावीन्य शोधून काढलं आणि मराठीत शायरी प्रकार आणला.
त्यांनी रचलेल्या कविता ते त्यांच्या पत्नीला ऐकवत आणि त्यांच्या पत्नी इंदुताई त्या लिहून घेत.हळूहळू त्यांच्या रचना लोकप्रिय होऊ लागल्या. त्यांच्या शायरीचे कार्यक्रम पुणे, नाशिक, मुंबई आणि महाराष्ट्रभर होऊ लागले. इतकंच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील हैद्राबाद वैगरे शहरात सुद्धा होऊ लागले. त्यांच्या शायरीच्या मैफिलीत वाह वाह आणि प्रेक्षकांचा जल्लोष अविरत चालू असे.
सुरवातीला त्यांच्या शायऱ्यांमध्ये विनोद आणि प्रणय यांची रेलचेल असायची पण जेव्हा त्यांनी शायरी या प्रकार खोलवर अभ्यासला तेव्हा जीवन आणि तत्वज्ञान अशा विविध विषयांवर त्यांनी शायरी लिहिली. त्यांचं लेखन हे कायम आनंद देणारं, कधी गंभीर आणि हसवून जाणारं असायचं. भाऊसाहेबांनी पुढे मराठी शायरी, मुशायरा, दोस्त हो, मैफिल, जिंदादिल अशी पुस्तके काढून मराठी रसिकांच्या अभिरुचीमध्ये नव्याने भर घातली. दोस्तहो आणि जिंदादिल या संग्रहांनी मराठी रसिकांना वेड लावलं होतं.त्यांची शायरी हि उर्दू शायरीपेक्षा अत्यंत वेगळी आणि स्वतंत्र होती त्यामुळे ती मराठीत जास्तच लोकप्रिय झाली.
( संदर्भ - बोल भिडू)