(१५ जुलै १९२७‒२९ जून २०१०).
महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत, व्यासंगी लेखक व सुप्रसिद्ध वक्ते.त्यांनी दैनिक सकाळ व दैनिक लोकसत्ता यांमधून दीर्घकाळ सदर लेखन केले. त्यांची दीपस्तंभ, यक्षप्रश्न, मुक्तिगाथा महामानवाची, कथा वक्तृत्वाची, जागर : खंड १ व २, हितगोष्टी, प्रेरणा, देशोदेशीचे दार्शनिक, जीवनवेध हे ग्रंथ मान्यता पावलेले आहेत.
त्यांच्या तत्त्वज्ञानात समन्वयाला महत्त्व होते. मतामतांच्या गलबल्यात हरवलेले सत्य शोधून काढणे आणि लोकांपुढे मांडणे हे त्यांचे कार्य होते. सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल, कांट या तत्त्वचिंतकांप्रमाणेच त्यांनी आपल्या विचारात आणि आचरणात नीतीला केंद्रबिंदू मानले.
पंढरपूरला वारीतून जाताना वारकर्याने शरीराची काळजी म्हणून विज्ञानाचा आधार घ्यावा, तर मनाच्या पोषणासाठी विठ्ठलाचे स्मरण करावे. दोन्हींची माणसाला गरज आहे, असे ते सांगत. अशा तर्हेने समन्वयाची भूमिका घेत जीवनवादी-आदर्शवादी तत्त्वज्ञानाची मांडणी प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी केलेली दिसते.त्यांना अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभलेली होती. . पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत १९६९ ते १९९७ या काळात सतत अठ्ठावीस वर्षे व्याख्याने देण्याचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला.त्यांनी स्वामी विवेकानंद, श्री अरविंद, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, रवींद्रनाथ टागोर आदी थोर व्यक्तींच्या चरित्राचा अभ्यास केला, शिवाय महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर, स्वामी चक्रधरांपासून ते संत गाडगेबाबांपर्यंतच्या संतांचाही त्यांचा व्यासंग होता.
(संदर्भ - मराठी विश्वकोश, मिलिंद जोशी)