दि. बा. मोकाशी

दि. बा. मोकाशी 


( २७ नोव्हेंबर १९१५ - २९ जुन १९८१ ), 

ख्यातनाम मराठी कथा-कादंबरीकार. संपूर्ण नाव दिगंबर बाळकृष्ण मोकाशी.विविध अनुभूतींतून माणूस शोधण्याचा, व्यक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न हे त्यांच्या कथालेखनाचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. रहस्यकथा, पिशाच्चकथा असे कथाप्रकारही त्यांनी हाताळले आहेत. 



लामणदिवा या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहात त्यांची प्रयोगशीलता दिसून येते. पण कथामोहिनीपासून त्यांच्या कथेने खूपच पुढचा  टप्पा गाठला आहे. व्यक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेण्याचे त्यांचे सामर्थ्य ‘गोष्टीची मोहिनी’, रहस्यकथेचा एक दिवस ’ यांसारख्या कथांतून दिसून येते. पण आता ‘आमोद सुनासि आले’ यासारख्या कथेत मात्र ते कथालेखनाचा एकदम वरचा पल्ला गाठतात. भावचित्रणातील हळुवारपणा व नाजुकपणा आणि घटनेतील नाट्य यांचा संगम या आणि त्यांच्या अनेक कथांतून आढळून येतो. 



अनेक जीवनानुभवाच्या वेगवेगळ्या पातळींवरून अनुभव घेऊन, त्यामध्ये संगती शोधण्याचा प्रयोग त्यांनी आपल्या अनेक कथांतून केला आहे. गूढकथा, पिशाच्चकथा, रहस्यकथा यांसारख्या त्यांच्या वेगळ्या वळणाच्या कथाही निश्चित उल्लेखनीय आहेत.विख्यात अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे ह्याच्या फॉर व्हूम द बेल टोल्स ह्या प्रसिद्ध कादंबरीचा घणघणतो घंटानाद (१९६५) ह्या नावाने त्यांनी केलेला अनुवाद उल्लेखनीय आहे. लहान मुलांसाठीही त्यांनी पुस्तके लिहिली आहेत.

संध्याकाळचे पुणे (१९८०) हे त्यांचे अखेरचे पुस्तक. मोकाशी ह्यांना संध्याकाळच्या पुण्याची जी विविध रूपे दिसली, त्यांचे लालित्यपूर्ण दर्शन त्यांनी ह्या पुस्तकात घडविले आहे. 


( संदर्भ - विश्वकोश , म ना अदवंत)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.