(२१ जून १९२३–२१ सप्टेंबर १९८२).
श्रेष्ठ मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक. कवी आणि कथाकार या दोन्ही नात्यांनी रेग्यांनी मराठी साहित्यात वैशिष्ट्य पूर्ण स्थान मिळविले. त्यांच्या अनुवादित ललितकृतींनीही मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. व्हल्द्यीम्यिर मायकोव्हस्की या रशियन कवीच्या कवितांचा त्यांनी केलेला अनुवाद १९८१ मध्ये पँट घातलेला ढग या नावाने प्रसिद्ध झाला. तसेच अमेरिकन कवी वॉल्ट व्हिटमन याच्या कवितांचा त्यांनी केलेला अनुवाद तृणपर्णे या नावाने १९८२ मध्ये प्रसिद्ध झाला.
जीवनाची वस्त्रे (१९५१), काळोखाची पिसे (१९५४), चांदणे (१९५९), चंद्र सावली कोरतो (१९६३) आणि मासा व इतर विलक्षण कथा (१९६५) हे त्यांचे कथासंग्रह होत.
अद्भुताकडे झुकणारी विमुक्त, स्वैर चमकदार कल्पनाशक्ती, सर्वस्पर्शी वृत्ती आणि उपहास-उपरोधाची छटा असलेला विनोद ही त्यांच्या काव्याची महत्वाची वैशिष्ट्ये होत. खेरीज तरल संवेदनशीलता, निसर्गप्रेम आणि नवनवीन शब्दसंहतींचा वापर ही वैशिष्ट्येही त्यांच्या काव्यात दिसतात. ‘चंद्र सावली कोरतो’ सारख्या त्यांच्या कथांमधून जीवनातील विकृतीचे चमत्कृतीचे आणि अनेक विलक्षण अनुभवांचे चित्रण अतीव वेधकतेने आणि समरसतेने केलेले दिसते. त्यांना डेन्मार्क, नॉर्वे आणि रशिया या देशांमध्ये जाण्याची संधी मिळाली होती. अक्षरवेल, गंधर्व आणि देवापुढचा दिवा या त्यांच्या काव्यसंग्रहांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. माय्कोव्हस्की या रशियन कवीच्या कवितांच्या त्यांनी केलेल्या रूपांतरास सोव्हिएट रशियाने ठेवलेले नेहरू पारितोषिक लाभले होते. मुंबई येथे १९८१ मध्ये भरलेल्या समांतर मराठी साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते.
( संदर्भ - मराठी विश्वकोश, अनुराधा पोतदार)