(६ जुलै १९२७ - २८ ऑगस्ट २००१).
श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार.विख्यात साहित्यिक ग. दि. माडगूळकर ह्यांचे व्यंकटेश हे धाकटे बंधू. आपल्या वडील बंधूंच्या पाठोपाठ तेही साहित्यसृष्टीत आले आणि आपल्या प्रतिभेचा एक स्वतंत्र ठसा त्यांनी तेथे उमटविला.तत्पूर्वी माणदेशी माणसे हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी साहित्याला अनोखे होते. अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला.
ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. बनगरवाडी, वावटळ, पुढचं पाऊल, कोवळ दिवस , करुणाष्टक आणि सत्तांतर ह्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. बनगरवाडीतून व्यंकटेश माडगूळकरांची प्रयोगशीलता प्रत्ययास येते. रूढ अर्थाने ह्या कादंबरीला कथानक नाही. बनगरवाडी नावाच्या ह्या लहानशा गावातील सामूहिक जीवनाचे विविधांगी चित्रण तीत केलेले आहे. तेथील उजाड व निष्पर्ण सृष्टी, तेथील कंगालपणा, दुष्काळ, तेथील सण, उत्सव, रूढी, परंपरा, श्रद्धा, संकेत तेथील रहिवाशांच्या जीवनांतील चढउतार ह्यांना जिवंत शब्दरूप तेथे लाभले आहे. येथे कोणी विशिष्ट व्यक्ती नायक वा नायिका नाही, तर बनगरवाडी ह्या गावालाच नायकत्व देण्यात आलेले आहे. इंग्रजी व डॅनिश ह्या भाषांतून ही कादंबरी अनुवादिली गेली आहे
त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभले. त्यांत गावाकडील गोष्टी, काळी आई ह्यांसारखे कथासंग्रह, बनगरवाडी ही कादंबरी आणि सती ही नाट्यकृती ह्यांचा अंतर्भाव होतो. सत्तांतरला तर १९८३ चे साहित्य अकादेमीचे पारितोषिक प्राप्त झाले. १९८३ मध्ये आंबेजोगाई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला.
( संदर्भ - विश्वकोश, श्रीराम पुजारी)