(६ जुलै १८३७-२४ आँगस्ट १९२५).
थोर प्राच्यविद्यासंशोधक संस्कृतचे प्रकांड पडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक व कर्ते धर्मसुधारक तथा समाजसुधारक.त्यांची विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देते. एवढेच नव्हे, तर प्राचीन भारताचा सुसंगत पुराव्यांच्या आधारे इतिहास कसा शोधून काढावा, ऐतिहासिक घटनांचा प्रमाणशुद्ध अर्थ कसा लावावा, याचा उत्कृष्ट नमुना त्यांच्या ऐतिहासिक लेखनात सापडतो. त्यामुळे त्यांचे ग्रंथ हे भारताच्या प्राचीन इतिहासाचे आधारभूत ग्रंथ म्हणून स्वीकारले जातात. मालती-माधव ह्या संस्कृत ग्रंथाचे त्यांनी उत्कृष्टपणे संपादन केले.
प्राचीन भारतातील विविध धार्मिक संप्रदायांचा आणि विविध धार्मिक तत्त्वज्ञानांचा संगतवार इतिहास दाखविण्याचे महत्वाचे कार्य भांडारकरांनी लिहिलेल्या संशोधनपर ग्रंथांनी केलेले आहे. ते धार्मिक आणि सामाजिक सुधारणेचे प्रार्थनासमाजवादी अनुयायी-पुरस्कर्ते होते तरी भांडारकरांनी तिला स्वतंत्र वैशिष्ट्यांची जोड दिली.हिंदु धर्म वेळोवेळी कसा बदलत गेला आहे, वैदिक धर्माबरोबरच वेदिकेतर शैव, वैष्णव इ. धार्मिक संप्रदाय कसे निर्माण झाले, याची समर्पक उपपत्ती त्यांनी लावली.
रामकृष्णपंतांनी पुणे येथील ‘प्राच्यविद्या संशोधन मंदिरा’स आपल्या ग्रथांचा व संशोधन पत्रिकांचा अनमोल. संग्रह देणगी म्हणून दिल्यामुळे, ही महत्त्वाची संस्था उमी राहिली. डे. ए. सोसायटी, शिक्षणप्रसारक मंडळी, फीमेल एज्युकेशन सोसायटी, सेवासदन इ. पुण्या-मुंबईच्या अनेक शैक्षणिक संस्थांना त्यांच्या ज्ञानाचा व दातृत्वाचा लाभ झाला.
( संदर्भ - विश्वकोश, रा ना चव्हाण)