गोविंद बल्लाळ देवल

गोविंद बल्लाळ देवल 


(१३ नोव्हेंबर १८५५–१४ जून १९१६).

 प्रसिद्ध नाटककार आणि नाट्यदिग्दर्शक. देवलांनी इंग्रजीवरून तीन, संस्कृतवरून तीन व एक स्वतंत्र अशी एकूण सात नाटके रचली. टॉमस सदर्नकृत द फेट्ल मॅरेजवरुन गॅरिकने तयार केलेल्या इझाबेला  या रंगावृत्तीच्या आधारे दुर्गा (१८८६), शेक्सपिअरकृत ऑथेल्लोची रंगावृत्ती झुंझारराव (१८९०) व मर्फी आणि मोल्येर यांच्या अनुक्रमे ऑल इन द राँग  आणि गॉनारेल  या नाटकांवरुन फाल्गुनराव अथवा तसबिरीचा घोटाळा (१८९३) ही त्यांची परकीय नाट्यकृतींची रूपांतरे होत.



 पुढे फाल्गुनराव…चे गंधर्व नाटक मंडळीसाठी केलेले संगीत रूपांतर संशयकल्लोळ (१९१६) हे कमालीचे लोकप्रिय ठरले. मृच्छकटिक (१८८९), विक्रमोर्वशीय (१८८९) व बाणाच्या कादंबरीवर आधारलेले शापसंभ्रम (दुसरी आवृ. १९००) ही त्यांची संस्कृताधारे रचलेली नाटके.



 त्यांच्या दुर्गा नाटकाला राजाराम कॉलेजचे, तर शापसंभ्रमला इंदूरच्या महाराजांचे पारितोषिक मिळाले होते. पण या दोन्ही नाटकांपेक्षा त्यांच्या मृच्छकटिक, झुंझारराव आणि संशयकल्लोळ  यांना प्रायोगिक यश विशेष लाभले. तथापि यांहीपेक्षा त्यांचे सं. शारदा (१८९९) हे नाटक साहित्यिक आणि प्रायोगिक या दोन्ही दृष्टींनी अद्वितीय ठरले. देवलांनी रेनल्ड्झच्या मिस्टरीज ऑफ द कोर्ट ऑफ लंडन  ह्या कादंबरीवरून लंदनरहस्य, पूर्वार्ध भा. १ (१८९४) ही कादंबरी व पुणे वैभव  पत्रात प्रचलित विषयावर स्फुटलेखन केले होते.

 ( संदर्भ - मराठी विश्वकोश स गं मालशे )

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.