के. ज. पुरोहित

केशव जगन्नाथ पुरोहित 



( १५ जुन १९२३ - १७ ऑक्टोबर २०१८ ) 

आधुनिक मराठी कथाकार. शांताराम’ या टोपणनावाने लेखन. शांताराम यांनी विविध प्रकारचे लेखन केले असले, तरी त्यांची मुख्यत्वे ख्याती आहे, ती कथाकार म्हणूनच. १९४२ साली ‘संत्र्यांचा बाग’ या नावाने त्यांचा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. पुढे त्यांचे मनमोर (१९४४), शिरवा (१९५७), जमिनीवरची माणसं (१९६०), लाटा (१९६६), चंद्र माझा सखा (१९६९), अंधारवाट (१९७७), उद्विग्न सरोवर (१९८२), चेटूक (१९८४), संध्याराग (१९९०) हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांना या क्षेत्रातला स्वत:चा सूर गवसला तो त्यांच्या ‘शिरवा’ या कथासंग्रहापासून. पुढे कथाकार म्हणून त्यांचा लौकिक वाढतच गेला. त्यांचे काही लेखन गुजराती, बंगाली इ. इतर भारतीय भाषांतूनही अनुवादित झाले आहे. 




शांताराम यांच्या निवडक मराठी कथांचे काही संपादित संग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. मराठीप्रमाणे इंग्रजीतही काही लेखन केले आहे. त्यालाही मान्यता मिळून न्यूयॉर्क हेरॉल्ड ट्रिब्यूनचे आंतरराष्ट्रीय पारितोषिकही त्यांना मिळाले (९१५१). प्रभा केशव पुरोहित यांच्या साहाय्याने शेक्सपिअरच्या रोमिओ अँड ज्यूलियट नाटकाचा कथारूप स्वैर मराठी अनुवादही (१९५९) केला. त्यांचे काही लघुनिबंध ‘सावळाचि रंग तुझा’ (१९५०) या पुस्तकात आहेत. त्यांचे काही आत्मचरित्रपर लेखनही ‘व्रात्यस्तोम’ (१९९५) या पुस्तकात संकलित केले आहे.शांताराम यांची कथा मराठी नवकथेशी संबद्ध असली, तरी ती नवकथेच्या तंत्रमंत्रात अडकून पडणारी नाही. त्यांच्या कथेला स्वत:चा असा एक वैशिष्ट्यपूर्ण चेहरामोहरा आहे.अमरावती येथे १९८९ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. साहित्य संस्कृती मंडळाच्या कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. जागतिक मराठी साहित्य परिषदेचे ते उपाध्यक्ष होते. 

( संदर्भ - मराठी विश्वकोश, गो. मा. कुलकर्णी)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.