लेखक - अनिस सलिम
अनुवाद - शुचिता नांदापूरकर-फडके
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस
बेलबाॅय या इंग्रजी पुस्तकाचा हा मनोवेधक अनुवाद आहे.
अनिस सलिम ह्यांना २०१८ सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
कोवळ्या वयात अकल्पितपणे कुटुंबाची जबाबदारी अंगावर येऊन पडलेल्या मुलाची हो गोष्ट अस्वस्थ तर करतेच शिवाय कमकुवत लोकांना समाजातील विशिष्ट लोक कसे वागवतात याचा विचार करायला भाग पाडते.
विखुरलेल्या द्विपसमूहातील लतिफ राहत असलेलं बेट शहरापासून सगळ्यात दूर होतं. त्या बेटावरचे रहिवासी बोटीने बाजूच्या शहरात जायचे. सतरा वर्षांचा लतिफ शहरातल्या पॅरडाईज लाॅजमध्ये बेलबाॅय होता. पडेल ते काम करायला लागायचं. त्याचे वडील बोटीतून पडून बेटावर पर्यावरण संशोधन करणाऱ्या शास्रज्ञाला वाचवतांना बुडून मेले होते. नंतर आई कारखान्यात काजू सोलायचं काम करायची. दिवसभर काजूची भाजलेली सालं काढून तिची बोटं स्पंज सारखी झाली होती बोटांना भेगा पडल्या होत्या काजू पकडण्याचा छोटा धर्म अशक्य झाल्यावर तिला न्यायला जाणे नोकरी सोडावी लागली होती त्या कारखान्याच्या मालकाने लतिफला पॅरडाईज लाॅजमध्ये कामाला लावलं होतं. एखाद्या पवित्र शहरात मरण्यासाठी जावं तसं काही लोक आत्महत्या करण्यासाठी त्या लाॅजमधे यायचे. कामाच्या पहिल्याच दिवशी लतिफला एका रुममधला माणूस मेलेला दिसला. त्याने दारातूनच बघीतले, मॅनेजरने कपाटाची तपासणी करून पैसे खिशात घातले, नंतरच पोलीसांना फोन केला.
तिथे साफसफाईचं काम करणाऱ्या त्याच्या आईच्या वयाच्या स्टेला ने त्याला जे बघीतलं ते विसरून जायला सांगितलं. नौकरी टिकवायची असेल तर मॅनेजरची मर्जी सांभाळली पाहिजे होती. लतिफला घर चालवायचं होतं शिवाय दोन्ही बहिणींच्या लग्नासाठी पैसे साठवायचे होते. तो स्टेलाशी खुप गप्पा मारायचा बेटावरच्या काल्पनिक गोष्टी सांगायचा. ती हसत हसत ऐकायची. तिला समजायचं पण ती लतिफला नाराज करायची नाही.
लतिफ काम करीत होता. लाॅजच्या कामात रुळला होता. आता त्याला व्यवस्थित टिप मिळत होती.
फारशा प्रसिद्ध नसणारा सिनेमा नट पॅरडाईज लाॅजमध्ये काही दिवसांसाठी आला. त्याच्यासाठी काही बाही आणून दिल्यावर तो लतिफला भरपूर टिप द्यायचा. त्याच्या बोटात हिऱ्याची आंगठी होती. एकदा लतिफ त्याच्या रुममध्ये गेला तेव्हा तो मेलेला होता. त्याने आत्महत्या केली होती. नेहमीप्रमाणे मॅनेजरने त्याच्या पैशांवर आणि आंगठीवरही डल्ला मारला. काही दिवसांनी आंगठीच्या शोधात सिनेमा नटाचा भाऊ पोलीसांना घेऊन पॅरडाईज लाॅजमध्ये आला. या घटनेनंतर लतिफचं आयुष्य पुर्णपणे बदलतं कधीही पुर्ववत न होण्यासाठी.
पौगंडावस्थेच्या अखेरच्या टप्प्यावर असणाऱ्या लतिफचं भावविश्व उभं करण्यात लेखक कुठेही कमी पडत नाही. अगदी लहान वयात कुटुंब प्रमुख झाल्यावर आणलेला पोक्तपणाचा आव आणि त्याच्या बहिणींनी त्याची उडवलेली टर कौटुंबिक सुखाचा शिडकावा करतात तर लतिफ जेव्हा स्टेलाला कल्पनेतील घटना रंगवून सांगताना त्यातली विसंगती लक्षात आल्यावर गालातल्या गालात हसणारी परंतु त्याचा हिरमोड न करणारी, त्याला वेळोवेळी मॅनेजरच्या क्रोधापासून वाचवणारी स्टेला ही सगळी पात्रे वाचकांना मोहीत करतात. अनपेक्षित शेवट वाचकाला अंतर्मुख करतो.