( २७ जुन १८६४ - २७ सप्टेंबर १९२९ )
प्रखर राष्ट्रीय बाण्याचे साहित्यिक, पत्रकार व प्रभावी वक्ते. १८९८ मध्ये उत्कट देशाभिमानाच्या प्रेरणेने त्यांनी काळ हे साप्ताहिक सुरू केले. १९०८ मध्ये शिवरामपंतांनी वक्रोक्तिव्याजोक्तीची धार असलेली आपली लेखणी एखाद्या अस्त्राप्रमाणे वापरली आणि प्रतिपक्षाला नामोहरम केले.
सशस्त्र क्रांतीचा पुरस्कारही त्यांनी वक्रोक्तीचा आधार घेऊन अतिशय खुबीदारपणे केला. वक्रोक्तीचा इतक्या विपुल प्रमाणावर वापर मराठी साहित्यात शिवरामपंतांच्या पूर्वी कुणी केलेला नव्हता आणि त्यांच्या नंतरही तो तसा कुणी केला नाही.गोविंदाची गोष्ट, आणि विंध्याचल ह्या त्यांच्या कादंबऱ्या रम्याद्भुत स्वरूपाच्या आहेत.
कादंबरीलेखनात स्वतःचे वैशिष्ट्य त्यांना निर्माण करता आले नाही. बाणाच्या कादंबरीवर आधारित संगीत कादंबरी , शेक्सपिअरच्या मॅक्बेथवरून रचलेले मानाजीराव , ॲडिसनच्या केटोवर आधारित रामदेवराव अशा काही नाटकांखेरीज पहिला पांडव हे कर्णाच्या जीवनावरील स्वतंत्र पौराणिक नाटकही त्यांनी लिहिले आहे.शिवरामपंतानी कथालेखनही केले. ‘आम्रवृक्ष’, ‘एक कारखाना’, ‘प्रभाकरपंतांचे विचार’ अशा कथांतून त्यांनी राजकीय विचार पेरले आहेत. आपल्या कथांतूनही त्यांनी व्याजोक्तीचा उपयोग केला आहे. स्वैर कल्पनाविलासाने त्यांच्या काही कथा नटल्या आहेत.मराठ्यांच्या लढ्यांचा इतिहास या पुस्तकात मराठ्यांच्या १८०२ ते १८१८ मधील चौदा लढायांचा इतिहास दिला आहे आणि मराठ्यांच्या अपयशाची मीमांसा केली आहे.
( संदर्भ - विश्वकोश, गो म कुलकर्णी)