( २५ जुन १९३५ - ९ ऑगस्ट २०१९ )
आचार्य अत्रे यांनी राम कोलारकर ह्यांना लघुकथेचे कोलंबस म्हणून संबोधले होते, ते किती सार्थ होते, हे त्यांच्या कार्यावरून समजते.कोलारकर संशोधक, समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या विविध प्रस्तावनांतून जागतिक, तसेच मराठी लघुकथेचा प्रवास कसा घडला आणि लघुकथेला सद्यःस्वरूप कसे प्राप्त झाले, हे कळते.
मराठीतील विविध नियतकालिकांच्या उदयाचा इतिहासही त्यांच्या लिखाणात स्पष्ट होतो. ‘अभिजात’ आणि ‘लोकप्रिय’ लघुकथेची व्यवच्छेदक लक्षणे ओळखून कोलारकरांनी लघुकथा साहित्यपरंपरेचा आगळावेगळा मागोवा घेत अनेक स्त्री लेखकांनाही या परंपरेत मानाचे स्थान प्राप्त करून दिले.
एकप्रकारे मराठी लघुकथेचा नवीन ‘कॅनन’ निर्माण केला.उत्तम ,उदात्त देण्याचा वसा जे जे उत्तम, उदात्त, सुंदर आहे ते ते मराठी वाचकाला देण्याचे व्रतच जणू कोलारकरांनी घेतले होते. त्यांचा सगळा साहित्यसंसार याच भूमिकेतून गेली ६० वर्षे चालू होता. नवीन लेखकांना काहीच प्लॅटफॉर्म मिळत नाही म्हणून स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून ‘नवे लेखन’ हे मासिक कोलारकरांनी १९५७ मध्ये सुरू केले. वाचकांना उत्तम विनोदीकथा, ऐतिहासिक कथा, भाषांतरित कथा, जागतिक कथांचा खजिना उपलब्ध करून दिला.
( संदर्भ - सकाळ, प्रा. मुक्तजा मठकरी )