लेखिका - रेश्मा कुरेशी
सहलेखिका - तानिया सिंग
अनुवाद - निर्मिती कोलते
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस
१९ मे २०१४ या दिवशी शाळेत जाणाऱ्या रेश्माच्या आयुष्याचा दुर्दैवी दिवस होता. त्या दिवशी तिच्यावर ॲसिड टाकून विद्रुप करण्यात आले. अनेक महिने न संपणाऱ्या वेदना तिला आणि तिच्या कुटुंबियांना सुध्दा भोगाव्या लागल्या.
या दुर्दैवी घटनेनंतर हाॅस्पिटल व आणि पोलीस स्टेशनवर दाखवलेला असंवेदनशीलपणा चिरड आणणारा होता.
रेश्माला चांगले उपचार मिळावे म्हणून तिच्या वडिलांनी आणि दोन्ही भावांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. होतं नव्हतं ते सगळं विकलं. काही नातेवाईकांनी तोंड फिरवलं तर काहींनी मदत केली. अलाहाबादहून उपचारांसाठी मुंबईला आल्यावरही रेश्माचा मृत्युशी संघर्ष चालू होता. तिच्या वडिलांच्या डोक्यावर भरमसाठ कर्ज झालं होतं. तरीही त्यांनी आशा सोडली नव्हती. वडीलांची, भावाची पैसे जमवण्यासाठीची धावाधाव आणि काही वेळा झालेली अगतिक परिस्थिती बघून तिने एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
तिचा भाऊ अनेक लोकांसमोर, धर्मदाय संस्थांसमोर मदतीसाठी याचना करीत होता. त्याची याचना विवेक शर्मा या सामाजिक कार्यकर्त्या पर्यंत पोहोचली. त्यांना तो अर्ज रिया शर्मा हिच्याकडे पाठवला. ती ‘मेक लव्ह, नॉट स्कार्स’ या एनजीओ द्वारे ॲसिड हल्ल्याला बळी पडणाऱ्या मुलींसाठी काम करीत होती.
‘मेक लव्ह, नॉट स्कार्स’ हा एनजीओ आणि रिया शर्मा मुळे रेश्माच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आता तिच्या कुटुंबाला तिच्यासाठी खर्च करावा लागणार नव्हता. ‘मेक लव्ह, नॉट स्कार्स’ या एनजीओ ने पुढील उपचारासाठी रेश्माला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
पुढे #endacidsale या मेक लव्ह, नॉट स्कार्स’ या एनजीओ द्वारे उभारलेल्या चळवळीतून रेश्माला प्रसिध्दी मिळवून तर दिलीच, त्याचसोबत खुल्या ॲसिड विक्रीवर शासनाला निर्बंध टाकण्यास भाग पाडले. त्यावेळी या चळवळीसाठी त्यांनी बनवलेले व्हिडिओ समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत होते.
सतरा वर्षाची रेश्मा कुरेशी आणि एकवीस वर्षाची रिया शर्मा या दोघींनी एका प्रचंड व्यवस्थेला झुकवलं होतं.
एफ.टी.एल. मोडा यांनी रिया शर्मा शी संपर्क साधला. त्यांनी अनेक वेगवेगळ्या डिझायनर्ससाठी यशस्वीरीत्या फॅशन शो केले होते. त्यांची इच्छा होती की न्युयॉर्क फॅशन शो मध्ये रेश्माने भारतीय डिझायनर अर्चना कोचरसाठी रॅम्प वॉक करावा. अमेरिकेला जाण्यासाठी पासपोर्ट च्या अर्जापासून सुरूवात करावी लागली होती. तिच्या नात्यागैत्यात, मित्रमंडळीत परदेशी जाणारी, किंबहुना पासपोर्ट काढणारी रेश्मा पहिलीच होती.
न्यूयॉर्क फॅशन शो ने जागतिक प्रसिद्धी मिळाली. त्या ठिकाणी भेटलेल्या सनी लिओनी, शहारुख खान अशांनी ती देत असलेल्या लढ्याबद्दल तिचे कौतुक केले. जागतिक माध्यमातून रेश्मा आणि ‘मेक लव्ह, नॉट स्कार्स’ च्या रिया शर्माची दखल घेतली गेली. २०१६ ला फ्रान्स इथे पार पडलेल्या ‘कान्स इंटरनॅशनल फेस्टिव्हल’मध्ये #endacidsale मोहिमेला ग्लास लायन फॉर चेंज आणि ‘गोल्डन लायन फॉर फिल्म’ असे मानाचे पुरस्कार मिळाले. जबरदस्त इच्छाशक्ती यांच्या बळावर रेश्मा आणि रियाने अशक्य ते शक्य करून दाखवलं होतं. ‘मेक लव्ह नॉट स्कार्स’ ही संस्था आता ॲसिड हल्ल्यातील मुलींसाठी काम करणाऱ्यांसमोर एक आदर्श उदाहरण म्हणून पुढे आली होती.
प्रेरणादायी आणि सकारात्मक जीवनाचा संदेश देणारी ही एका सर्वसामान्य तरुणीची असामान्य गोष्ट आहे. तिने अन्यायाविरुद्ध निकराची झुंज दिली. आणि अशक्यप्राय अशा परिस्थितीवर मात केली. अत्यंत ओघवत्या शैलीत मांडलेली ही गोष्ट अंतर्मुख करते. रेश्माची त्या वेळी झालेली तडफड, विमनस्कता, मानसिक रित्या कोलमडूनं, आणि अनेक शत्रक्रिया होतांना शरीराचे झालेले हाल या सगळ्यांचं सलग वाचन अशक्य वाटतं. तरीही हे वाचलच पाहिजे.!