पुस्तकाचे नाव - मुलाॅ रूज
लेखक – पीएर ल मूर
अनुवाद – जयंत गुणे
हेन्री तुलूझ लोत्रेक या फ्रेंच चित्रकाराच्या जीवनावर आधारीत पीएर ल मूर याने लिहीलेल्या मुलाॅ रूज या कादंबरीचा हा स्वैर अनुवाद.
पीएर ल मूर हा फ्रेंच लेखक. दुसऱ्या महायुध्दानंतर त्याने अमेरीकेत स्थलांतर केले. तो पर्यंतचे त्याचे सगळे लिखाण फ्रेंचमध्ये आहे. पण अमेरीकेत आल्यानंतर त्याने इंग्रजीतून लिहायला सुरवात केली. मुलाॅ रूज ही त्याची इंग्रजीतील पहिली कादंबरी. ती अतिशय लोकप्रिय झाली. हॉलीवूडमध्ये त्या कादंबरीवर त्याच नावाने दोन चित्रपटही निघाले.
हेन्री तुलूझ लोत्रेकचा जन्म फ्रान्समधील एका प्रख्यात राजघराण्यात झाला होता. ऐन शैशवात एका विचीत्र आजाराची शिकार झाल्याने त्याच्या कंबरेखालील शरीराची वाढ खुंटली. आपण या आजारातून कधी काळी बरे होवू ही अपेक्षा त्याने सोडून दिली होती. नंतर काठीच्या आधाराने खुरडत का असेना पण चालू लागला होता. पौगंडावस्था संपल्यावर शरीराचा वरचा भाग आणि कमरेखालचा भाग अगदीच विसंगत होता. थोराड चेहरा, पसरलेली छाती आणि खाली काटकुळे अशक्त फेंगड्या पायाचा बुटका माणूस.
एकदा तो वेश्या वस्तीत गेला होता , तिथली एकही वेश्या त्याच्या जवळ गेली नाही. अगदीच बेंगरुळ, काहीसा भितीदायक दिसायचा. नंतर थोडीफार प्रसिध्दी मिळाल्यावर एका वेश्या एक दोन दिवस त्याच्या सहवासात आल्यावर पुढे त्याने तिला ठेवून घेतली. आपल्याला ती लुबाडते आहे हे समजूनही तो तिला घालवून देत नव्हता. तिच्याबद्दल त्याला पराकोटीचा द्वेष वाटत असुनही तिचा विरह तो सहन करु शकत नव्हता. त्याला फक्त तिच्या शरीराचे आकर्षण होते. पुढे जवळपास वर्षभराने त्याने तिला सोडले.
चित्रकाराचा पेशा घराण्याच्या इतमामाला शोभेसा नसला तरी हेन्रीने घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आपला हट्ट पूरा केला. त्यासाठी तो पॅरीसच्या प्रतिष्ठीत वस्तीतील आपले निवासस्थान सोडून शहरा बाहेरील मोंमार्त्र या गरीब वस्तीत रहायला गेला. आपल्या तोलामोलाच्या राजघराण्यातील जगापेक्षा मोंमार्त्रमधील कष्टकरी, सर्कस व नाटकातील कलाकार, नाईट क्लबमध्ये नाचणाऱ्या मुली, रस्त्यावर भटकणाऱ्या गावभवान्या यांच्या विश्वात तो समरसून रममाण झाला..
हे जीवन जगतानाच आपल्या कलेत त्याचे चित्रणही करत होता. आपल्या सभोवतालच्या रंगील्या निशाजीवनाची त्याने केलेल्या पेंटींग्जनी त्याला आधुनिक चित्रकलेच्या प्रवाहात स्वत:चे स्थान कसे मिळवून दिले, जरी तो दारुच्या आहारी गेला होता, तरीही आपल्या कलेशी कधीही अप्रामाणिकपणा केला नाही. मिळालेल्या प्रसिध्दीची हवा कधीच डोक्यात गेली नाही.
लोत्रेकने प्रामुख्याने पॅरीसच्या गावकुसाबाहेरील जगाचे चित्रण केले. स्वत:ची अशी खास शैली निर्माण करण्यात तो यशस्वी झाला. आपल्या व्यंगामुळे आपली हेटाळणी होते असे जरी त्याला वाटत असले तरी त्याचा मित्र परिवार खूप मोठा होता. त्याच्या परीचितांमध्ये तो लोकप्रिय होता. त्याची चित्रकार म्हणून प्रस्थापित होतानाची ध़डपड, त्याचे आणि वडिलांचे ताणलेले नाते या पार्श्वभूमीवर त्याचे आणि आईचे परस्परांवरचे अतूट प्रेम यांनी ही कहाणी हृदयस्पर्शी होते.
तो जेव्हा मरणाच्या दारात होता, तेव्हा त्याचा चित्र संग्रह लुव्हर संग्रहालयाने विकत घेतला ही बातमी त्याच्या आईला समजली तेव्हाशी कुठे आईला तो किती मोठा कलाकार होता हे जाणवलं. त्याच्या बापाने नेहमीच त्याच्या कलेची खिल्ली उडवली होती.
या कादंबरीतील सगळ्या व्यक्तिरेखा ह्या खऱ्या आहेत. लोत्रेकने स्वत: त्यातील बऱ्याच जणांची पोर्ट्रेट केली आहेत. पीएर ल मूरने थोडे फार लेखकाचे स्वातंत्र्य घेतले असले तरी कादंबरी बऱ्याच प्रमाणात लोत्रेकच्या जीवनाशी प्रामाणिक आहे.
उनाड जीवनशैली आणि अतिरीक्त मद्यपान यामुळे बदनाम झालेल्या लोत्रकेने आपल्या अवघ्या छत्तीस वर्षांच्या आयुष्यात जी प्रचंड निर्मिती निर्मीती केली ती पाहून आपण थक्क होतो. आयुष्य कितीही झोकून दिले तरीही लोत्रेक आपल्या कलेशी सदैव प्रामाणिक राहिला. त्याचं एकूण जीवनावर आणि मुख्य म्हणजे माणसांवर विलक्षण प्रेम होतं आणि ते त्याच्या पेंटींगमध्ये दिसून येतं.
एकोणीसाव्या शतकातील पॅरीसच्या सांस्कृतिक आणि कलाजीवनावर ही कादंबरी बेतलेली असून प्रस्थापितांविरूद्ध साचलेपणाविरोधात बंड करणारा, न्युड मॉडेल संबंधी आपली मते ठामपणे मांडणारा हेन्री तुलूझ लोत्रेक देशकालाच्या सीमा ओलांडत आपल्या संवेदनशीलतेला आवाहन करत रहातो.
कथानकाच्या ओघात त्याच्या पेंटींग्जचा उल्लेख येतो त्यावेळी ते पेंटिंग सद्यस्थितीत कुठे आहे याचाही खुलासा केलेला असून त्याच्या अनेक प्रसिद्ध पेंटिंग्जची छायाचित्रेही या पुस्तकात समाविष्ट केलेली आहेत.
मुलाॅ रुज ह्या कादंबरीचा स्वैर अनुवाद वाचणं, हा खरोखरीच एक झपाटून टाकणारा अनुभव आहे. पात्रांची नावं सोडल्यास, फ्रान्समध्ये घडणारी ही कथा, त्यातील वातावरण, संवाद सारं काही मराठीमय होऊन गेलंय, इतका सुंदर, अकृत्रिम आणि ओघवता अनुवाद झालेला आहे
https://www.esahity.com या संकेतस्थळावर हे पुस्तक इ बुक स्वरुपात मोफत उपलब्ध आहे.
मी अनुवाद केल्याला पंधरा वर्ष उलटून गेलेली असली तरी अजूनही ती वाचकांना का आवडते ते तुम्ही नेमक्या शब्दात मांडले आहे. आई मुलाचे नाते मुलगा कितीही वेगळ्या वाटेने गेला तरी अतूट असते हे सार्वकालिक सत्य आहे. धन्यवाद.
ReplyDelete