पुस्तकाचे नाव - नष्टनीड
लेखक - रविंद्रनाथ टागोर
अनुवाद - नीलिमा भावे
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस
विवाहबाह्य संबंध हा टागोरांचा अभ्यासाचा विषय असलेला दिसतो. त्यांच्या आणखीही काही प्रसिद्ध-कमी प्रसिद्ध कथा कादंबऱ्यांमधून त्यांनी त्याचा शोध घेतला आहे. या विषयावर आधारलेल्या वेगवेगळ्या कथानकांमधून त्याची वेगवेगळी रूपं ते शोधताना दिसतात. मात्र या शोधामागे एक समान सूत्र असलेले जाणवले‚ ते टागोरांचे या प्रश्नाकडे पाहायच्या दृष्टीचे. ही सगळी कथानकं त्यातल्या व्यक्तिरेखांकरवी वेगवेगळ्या प्रकारे पुढे पुढे सरकत असताना टागोर कुठेही त्यांच्या वागण्याबद्दल चांगले-वाईट‚ योग्य-अयोग्य‚ नैतिक-अनैतिक असं मूल्यमापन करीत नाहीत. त्या संबंधात गुंतलेल्या व्यक्तींची त्यांच्या स्वत:च्या वर्तणुकीमुळे झालेली ती अनामिक होरपळ असते आणि त्या होरपळीच्या वेदना या कामी मूकपणे सहन करीत राहतात.
‘नष्टनीड’मधल्या चारूकडे तिचा पती भूपती स्वत:च्या कामात गर्क होऊन तिच्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे तिचा लांबचा दीर अमल यांच्याकडे ओढली जाते.
‘मालंच’मधला आदित्य त्याची पत्नी नीरजा जिच्या लांबलचक आजारामुळे त्याची बालपणची सवंगडी सरला हिच्या सहवासात येतो.
‘दुईबोन’मधला शशांकदेखील त्याची पत्नी शर्मिला हिच्या आजारपणामुळे त्याची मेहुणी उर्मीला हिच्या अधिक सहवासात येतो.
नष्टनीड’मधलं अमल आणि चारू यांनी एकमेकांच्या संगतीनं केलेलं लेखन‚
‘मालंच’ मधलं आदित्य आणि सरला यांचं एकत्रितपणे वारंवार बागकाम
‘दुईबोन’मधल्या उर्मीलाच्या नवशिक्या‚ उत्साही सहभागानं घुसळून टाकलेला शशांकचा बांधकामाचा व्यवसाय.
हे घटक या व्यक्तींना एकमेकांच्या जवळ ओढून आणतात आणि नंतर एकमेकांपासून दूरही करतात. अखेरीस त्यांच्या आयुष्याच्या शोकांतिकेला कारणीभूत होणारे घटक ठरतात.
या कादंबऱ्या मूळ बंगालीत प्रसिद्ध झाल्या. त्याला आता जवळपास शतक उलटून गेलयं. त्या काळात त्यांचे विषय आणि त्यांची कथानकं विवाद्य ठरली होती यात आश्चर्य नाही. आजच्या वाचकांना साहित्यामध्ये विवाहबाह्य संबंधांचं चित्रच धक्कादायक वाटत नाही. पण टागोरांचा या संबंधाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजच्या वाचकांना नक्कीच जवळचा वाटेल. टागोरांच्या कथा-कादंबऱ्यांमधून दिसणारी स्त्री-पुरुषांच्या मनोव्यापारांची अजोड समज त्यांना त्यांच्या काळाच्या कितीतरी पुढे आणते.