( २४ ऑगस्ट १८८० - ३ डिसेंबर १९५१ )
निरक्षर असुनही बहिणाबाईंकडुन जी साहित्यनिर्मिती झाली त्याला तोड नाही. त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी आणि काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या.
त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे "लेवा गणबोली" तील ओव्या व कविता रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी कविता तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. बहिणाबाईंनी काम करता करता ह्या कविता लिहिल्या आहेत.
जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचे रूपांतर संग्रहालयात झालेले आहे. त्याला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट असे नाव देण्यात आले आहे.
१९५० सालच्या जुलै ऑगस्ट मध्ये बहिणाबाईंचे चिरंजीव सोपानदेव चौधरी प्र. के. अत्रे यांच्याकडे आले. त्यांच्या हातात कवितांचे बाड होते . बहिणाबाईंच्या कविता सोपान देव आणि त्यांच्या एका भावाने लिहिल्या. कारण बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नव्हते. बहिणाबाईंच्या मृत्यू नंतर त्यांच्या साहित्याची विल्हेवाट लावताना त्यांना ही वही सापडली होती. कविता चाळलया बरोबर अत्रे उद्गारले 'हे तर शंभर नंबरी सोन आहे. महाराष्ट्रापासून हे विचारधन लपवले तर ते पाप ठरेल!' असे म्हणुन अत्र्यांनी बहिणाबाईंची साहित्यसंपदा प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला.
( संकलीत)