लेखिका - लेस्ली टी छांग
अनुवाद - गौरी देशपांडे
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस
फॅक्टरी गर्ल्स हे पुस्तक वाचकांना चीनमधील तरुण आणि महत्त्वकांक्षी तरुण मुलींच्या आयुष्याची सफर घडवते. ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित झालेल्या या मुलींनी पत्करलेला धोका, केलेला त्याग आणि मिळवलेलं यश प्रभावीपणे मांडत असतानाच चीनचा इतिहास आणि त्यातील काही महत्त्वाचे संदर्भ यांची सांगड घातलेली आहे. शिवाय चीनच्या भरभराटीमध्ये अदृश्य योगदान असलेल्या मनुष्यबळांच्या वास्तविकतेवर प्रकाश टाकलेला आहे.
तोंगकुवान या औद्योगिक शहरांमध्ये दोन तरुणी करिअरमध्ये असेंब्ली लाईन पासून मोठी झेप घेण्याच्या प्रयत्नात असतानाच तीन वर्षातला त्यांचा जीवन संघर्ष लेखिकेने त्यांच्यासोबत राहून प्रत्यक्ष अनुभवला आहे. त्यांच्या सोबत असलेल्या मुली अचानक गायब व्हायच्या, दुसरीकडे कुठेतरी
दिसायच्या तेव्हा ओळख द्यायलाही तयार नसायच्या. बहुतांश त्या परत दिसायच्याच नाही.
गावात करण्यासारखं काही नव्हतं शिवाय कुटुंबाची जबाबदारी होती म्हणून आम्हाला शहरात जाऊन काम शोधावं लागलं. प्रत्येक मुलीच्या कथेची सुरुवात अशीच होती. या मुलींच्या कथा भारावून टाकणाऱ्या, दुःखद परंतु प्रेरक आहेतच, शिवाय प्रयत्नशील सातत्य, चिकाटी आणि एकाकीपणाची ही उदाहरणे आहेत.
अर्थव्यवस्था थोडी फार खुली केल्यावर विदेशी उत्पादकांसाठी सवलतीचे धोरण स्वीकारल्यानंतर युरोप अमेरिकेतील अनेक उद्योजकांनी कारखाने उभे केले त्याचं मुख्य कारण म्हणजे कमीतकमी सरकारी हस्तक्षेप आणि स्वस्त मनुष्यबळ. या कामगार वर्गाला कसं वागवलं जातं या कडे सरकारने नेहमीच दुर्लक्ष केलं. त्यामुळे कामगारांना कारखान्यात प्रवेश करणे तसं सोपं होतं पण तिथून बाहेर पडणं महा कठीण होतं कारखान्यातलं हे वास्तव बाहेरून समजू शकणार नव्हतं कारखान्यात हजारो कामगार होते त्यातल्या बहुतांश महिला आहेत. एकतर नुकत्याच घरातून कामासाठी बाहेर पडलेल्या किशोरवयीन किंवा तिशी ओलांडलेल्या विवाहित महिलांच प्रमाण जास्त आहे.
असेंब्ली लाईन मधला दिवस सकाळी आठ वाजता सुरू व्हायचा आणि मध्यरात्रीपर्यंत चालायचा. रोज बारा तेरा तास काम करावं लागायचं. त्यामध्ये दोन वेळच्या जेवणाची सुट्टी मिळायची. कारखान्यात काम करताना बोलायला बंदी होती. कोणी बोललंच तर दंड भरावा लागायचा. बाथरूम ब्रेक चार तासानंतरच असायचा. काही कारखान्यात मुलींच्या राहण्याची सोय असायची तिथेच एकाच खोलीत दहा-बारा मुली अत्यंत दाटीवाटीने राहायच्या.
ग्रामीण भागातल्या तरुण मुलींवर घराकडून विशिष्ट दबाव असायचा या मुलींनी झटपट प्रगती केली नाही तर त्यांना घरी परत बोलून लग्न करायला सांगितलं जायचं आणि एकदा शहरात आलेल्या मुलींना परत गावी जायची इच्छा नसायची. अत्यंत कमी वयात शहरात येतांनाच शिक्षण अर्धवट सोडलेलं असायचं त्यामुळे आपोआपच संधी कमी व्हायचा. काही मुली मात्र ओढाताण करून पोस्टल कोर्स किंवा नाईट स्कूल मधून शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्नात असायच्या. इंग्रजी आणि कॉम्प्युटर या कोर्सला विशेष मागणी असायची.
या मुली स्वतः कमावत्या असल्यामुळे व घरच्यांपासून दूर राहत असल्यामुळे काहीशा बेलगाम व्हायच्या. विवाहपूर्व व विवाहबाह्य संबंध, प्रेम त्रिकोण हे प्रकारही बोकाळलेले होते. बेकायदेशीर गर्भपाताचे प्रमाणही मोठे होतं. यात काही मुली आयुष्य अकाली संपवतही होत्या.
स्वतःचं रुग्णालय असलेला महाकाय स्निकर कारखाना, विद्यार्थी अतिशय समर्पणाने शिकत असलेले इंग्रजी वर्ग, आणि मुलींना घर सोडून बाहेर पडायला लावणारी गरिबी आणि रिकामपणाने ग्रासलेली शेतीप्रधान गाव, अशा ठिकाणची सफर आपल्याला घडवली आहे. ग्रामीण भागातल्या गावांपासून शहराकडे होत असलेल्या प्रचंड स्थलांतरामुळे चिनी समाजामध्ये कसे बदल घडत आहे हे आपल्याला या पुस्तकातून उलगडते. त्याचसोबत मागील काही शतकात कारणपरत्वे झालेल्या स्थलांतराचा इतिहास समजतो.