श्रीपाद महादेव माटे
(२ सप्टेंबर १८८६–२५ डिसेंबर १९५७). बहुविध स्वरूपाचे ललित आणि वैचारिक लेखन करणारे, स्वतंत्र प्रज्ञेचे शैलीकार साहित्यिक. वाङ्मयीन कारकीर्दीच्या आरंभकाळात त्यांनी केसरीप्रबोध (१९३१) ह्यां ग्रंथाचे एक संपादक म्हणून परिश्रमपूर्वक काम केले .या ग्रंथासाठी लेखनही केले.
अस्पृश्यांचा प्रश्न (१९३३) हा आपला मूलगामी ग्रंथ लिहिण्यापूर्वी अस्पृश्यतानिवारणाचे कार्य त्यांनी अनेक वर्षे तळमळीने केले होते. ते करीत असताना आलेल्या अनुभवांतून स्वतःचे चिंतन परिपक्क झाल्यानंतरच ह्या ग्रंथाच्या लेखनाला त्यांनी आरंभ केला. रसवंतीची जन्मकथा (१९४३) ह्या आपल्या मौलिक ग्रंथात, भाषेचा जन्म आणि विकास कसा झाला, ह्याचे विवेचन त्यांनी उत्क्रांतितत्त्वाच्या आधारे केले आहे. त्यांचा पिंड चिंतनशील समाजशास्त्रज्ञाचा असल्यामुळे त्यांचे महत्त्वाचे वैचारिक लेखन ह्या चिंतनशीलतेतून निर्माण झाले आहे.
उपेक्षितांचे अंतरंग, अनामिका, माणुसकीचा गहिंवर, भावनांचे पाझर ह्यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध असून महारमांग, रामोशी, कातवडी इ. उपेक्षित जमातींतील व्यक्तींचे, त्यांच्या सुखदुःखांचे त्यांच्या जीवनरीतींचे अत्यंत प्रत्ययकारी चित्रण त्यांनी त्यांत सह्रदयतेने केले आहे. ‘कृष्णाकांठचा रामवंशी’, 'तारळखोऱ्यातील पिऱ्या', ‘नाथनाक आणि देवकाई ह्यांची काळझोप’ आणि ‘सावित्री मुक्यानेच मेली’ ह्यांसारख्या त्यांच्या कथा आजही अविस्मरणीय वाटतात. पश्चिमेचा वारा ही त्यांची एकमेव कादंबरी. आपल्या प्रज्ञेस सतत प्रज्वलित व स्वतंत्र ठेवून मराठी वाङ्मयावर एक चिरंतन मुद्रा उमटविणाऱ्या थोर ज्ञानोपासकांत माटे ह्यांची गणना केली जाते.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)