लेखक - महाबळेश्वर सैल
प्रकाशक - राजहंस प्रकाशन
पेशवाईचे पतन झाल्यावर संपूर्ण हिंदुस्थानावर इस्ट इंडिया कंपनीचा अम्मल सुरु झाला होता. त्याच्या फार अगोदरपासून, जवळपास दोन शतके अगोदर गोवापाटण मधे पोर्तुगीजांचे राज्य होते. त्या कालखंडात धर्मांध राज्यकर्त्यांनी जो उन्माद केला त्याची ही कहाणी.
क्रौर्य, स्वार्थ, भीती, दया अशा भावनांनी पछाडलेली माणसे कशी वागतात आणि त्यातही त्यामागची प्रेरणा जर धर्म असेल तर त्यातून काय काय उत्पाद घडू शकतात, याचे विदारक चित्र या कादंबरीतून होते.
आदोळशी हे एक छोटसं गाव असलं तरीही जातीपातीचे प्रस्थ मोठं होतं. अशा गावत तहानभुकेने व्याकुळलेला, भितीने गांगरलेला तरुण आसरा मागायला आला. गोऱ्यांना विहिरीतून पाणी काढून दिलं, आणि पुढची वाट दाखवली म्हणून गोऱ्यांनी त्याला खायला गुळाच्या पाकातली काही फळं दिली होती, पण त्याच्या आसपास असलेल्या त्याच्या भावकीतल्या लोकांना असे वाटले त्याने त्यांच्या हातचं मांस खाल्लं. या लोकांनी त्याला बहिष्कृत करून गावाबाहेर काढलं. ग्रामीण भागातील लोक एवढेच जाणवत होते की, सातासमुद्रापलीकडून परधर्माचे कोणीतरी गोवा पाटणात आलेले आहेत आणि ते गाईचे मांस खातात. त्यांच्या हातचं काही खाल्लं तर माणूस कायमचा बाटून जातो, नरकात पडतो. या समजुतीने आदोळशीच्या गावाकऱ्यांनी त्या तरुणाला हाकलून दिले. दुसऱ्या दिवशी त्या बाटग्या तरुणाचा देह ओहोळात तरंगत होता.
आता गोरे लोक गावातही येऊ लागले होते. त्यांच्यासोबत असलेल्या दुभाषा ओरडायचा, आता हे राज्य आमचं आहे. आम्ही आदिलशहाकडून गोवा बेट जिंकून घेतलं आहे. तुम्ही आता पोर्तुगालच्या राजाची प्रजा आहात, असे समोर या.. लपलेले गावकरी समोर येण्याऐवजी अवचित एका बाईने दार उघडून हातातलं लाकडी मापटं त्या गोऱ्या कप्तानावर फेकून मारलं आणि तणतणली, साता समुद्राबाहेरून आलेली भ्रष्ट भूतं.
कप्तानाने मनोमन निश्चय केला, या गावातल्या सगळ्या लोकांना सहा महिन्याच्या आत ख्रिश्चन करण्याचा... त्याला व्हाइसरॉय चा पाठिंबा तर होताच. राजाचाही पाठिंबा होता. राजाचा जो धर्म तोच प्रजेचा धर्म असायला हवा होता.
मग सुरू झाली अरेरावी. सुरुवातीला धर्मांतर करण्यासाठी प्रलोभन दाखवण्यात आले. मग एखादा काही कारणाने कचाट्यात सापडला तर धर्मांतर केलं तर माफ करण्याची, किंवा गुन्हे माफ करण्याची लालूच दाखवली गेली. घरातला पुरुष मृत झाला, आणि त्याच्या पत्नी हिंदू असेल तर जी काही संपत्ती असेल ती सरकार जमा होईल. मात्र तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर ती संपत्ती तिला ठेवता येईल. असे अनेक धर्मांतर करण्यासाठी अनुकूल कायदे करण्यात आले. मंदिरे जमिनदोस्त करुन चर्च उभारण्यास सुरूवात झाली. ज्यांनी विरोध केला त्यांना जबरी मारझोड करण्यात आली. काही लोकं जीवाला मुकली तर काहींना घरादाराचा मोह सोडून पलायन केले. ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्विकारला त्यांना जमीनी देण्यात आल्या. त्यांच्या रक्षणाचीही जबाबदारी घेतली गेली. पैसेसुध्दा देण्यात आले, त्यांच्याशी भांडणाऱ्यांना शिक्षा होऊ लागली.
फक्त ख्रिश्चन धर्म स्विकारून भागत नव्हतं तर धर्माचं पालन करतांना काही चुकलं माकलं तर इनक्विझीशनचा धाक होताच. मुळ ख्रिश्चन असलेले सुध्दा इनक्विझिशनच्या अधिकाऱ्यांना घाबरायचे. एकदा ख्रिश्चन धर्म स्विकारल्यावर काही विरोधी कृत्य केले किंवा अगोदरच्या धर्माच्या चालीरीती पाळल्या तर इनक्विझीशन कोर्टाकडून कडक शिक्षा मिळायची. बहुतांश तो माणूस परतायचाच नाही. थोडक्यात काय तर ख्रिश्चनांव्यतिरिक्त इतर धर्मीयांचे जगणे मुश्किल करुन टाकले होते. जर जगायचं असेल आणि जगणं थोडफार सुसह्य करायचं असेल तर ख्रिश्चन धर्माचा स्विकार करणं भाग होतं, इतकच नाही तर धर्माचं काटेकोर पालन करणं सुध्दा गरजेचं होतं, नाही तर जगणं किड्यामुंग्याच्या बरोबरीचंच, त्याही पेक्षा वाईट असायचं.
माणुसकीचे पीक करपवून टाकणारे धर्मांध टोळ, किडा मुंगी सारखी गोव्याच्या गावागावात, शेताबांधात गाडली गेलेली माणसे, सतीच्या ज्वाळेत जळणाऱ्या कोवळ्या लेकीबाळींचे कातर हुंदके, खचलेली मंदिरे आणि रक्ताने ओथंबलेले क्रूस या सर्वातून दिसणारा हा रक्तरंजित इतिहास.
धर्मांध केवढे क्रूर व हिंस्र होऊ शकतात. त्यांच्या लेखी माणूस केवढा नगण्य होऊ शकतो याची अंगावर शहारे आणणारी ही कहाणी आहे.