लेखक - सरोजकुमार मिठारी.
"हे आत्मकथन मी कोण आहे कुठून आलो कुठे जायचं आहे याचा शोध घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक वाचकांसाठी भरकटलेलं जहाज मार्गस्थ करणारा दीपस्तंभ आहे. " असं जेष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे प्रस्तावनेत म्हणतात.
सरोज चा जन्म रोजचं दारिद्र्य असलेल्या घरात झाला. वडील असले तरीही संसाराचा गाडा आईने ओढला. आजी मामा यांच्या गोतावळ्याने पडत्या काळात हात दिला म्हणून सरोज सहज शिकू शकला. परिस्थितीची जाणीव उपजत शहाणपण समाज आणि शाळेतील सहृदांचा आधार यामुळे प्रत्येक वळणावर संकट उभे टाकलेला असलं तरीही त्याची नाव पैलतीरी गेली ती केवळ संघर्ष व प्रयत्न सातत्याने.
आयुष्याच्या वळणावर समाजात काही संवेदनशील समाजशील माणसं असतात म्हणून मास्तरांच्या वाड्याचा आधार मिळतो. चांगले शिक्षक भेटतात म्हणून प्रेरणा आणि प्रोत्साहन लागतं. उभारीच्या काळात कमवा व शिका हे सूत्र परिस्थिती हाती देते व त्या बळावर शिक्षण पूर्ण होते.
एस एस सी झाल्यावर काॅलेजमध्ये प्रवेश घेतला खरा पण परिस्थिती शिक्षण घेऊ देत नव्हती. एम आय डि सी त काम करतांना शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ लागलं. काॅलेज सोडून खाजगी आयटीआय ला प्रवेश घेतला. एकदा सायकलवरून जातांना अपघात होऊन गुढग्याला मार बसला. ऑपरेशन करावं लागलं. किमान सहा महिने फारसं काही करता येणार नव्हतं म्हणून काॅलेजमधल्या शिक्षकांनी समजल्यावर परत काॅलेजमध्ये प्रवेश घेतला. आणि इथेच आयुष्याला एक वेगळेच वळण नकळतपणे मिळाले.
काॅलेजमध्ये आनंद यादवांची झोंबी वाचनात आल्यावर दारिद्र्यावर मात करण्यासाठी अभ्यास व मेहनतीला पर्याय नाही हे मनात ठसले गेले. नंतर वाचनाची व्याप्ती वाढतच गेली. या काळातच वैचारीक पाया मजबूत झाला. वक्तृत्व बहरत गेले. लेखनालाही काहीशी गती मिळाली.
सुरज कुमार यांना शिक्षक व्हायचे होते पण विनाअनुदानित शाळेत अनेक महिने किरकोळ मानधनावर राबूनही नियुक्ती मिळत नव्हती म्हणून त्यांनी शाळा सोडून पत्रकारिता सुरू केली. तिथेही तडजोड न करता राजीनामा दिला. पुढे खाजगी शिकवण्या करीत ते निर्वाह करीत राहिले. दरम्यान वडिलांना झालेल्या कुष्ठरोगाशी सामना करावा लागला. अशातच मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातील विविध पदांच्या भरतीची जाहिरात वाचनात आली आणि त्यासाठी त्यांनी अभ्यास सुरू केला.
असा हा मराठी विश्वकोश मंडळातील संपादक मंडळातील विद्याव्यासंगी सरोजकुमार मिठारी ह्यांचा मन हेलावून टाकणारा जीवनप्रवास !
आशयपूर्ण परिचय. नोंद घेतल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
ReplyDelete