लेखक - मिच अॅल्बम
अनुवाद - डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके
प्रकाशक - मंजुल पब्लिशिंग हाउस
एका माणसाचं आपल्या गुरूप्रती असलेल्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे हे पुस्तक, वाढतं वय आणि वार्धक्य यांना वाहिलेली हळुवार श्रद्धांजली आहे.दुर्धर रोगाने आजारी असलेले प्राध्यापक आणि त्यांचा ‘यशस्वी’ विद्यार्थी यांच्यातील अत्यंत सुरेख आणि प्रामाणिक अशी ही विचारांची देवाणघेवाण आहे.
मरणासन्न अवस्थेत असताना प्राध्यापकांबद्दल वाटणारा आदर, प्रेम, कौतुक आणि समर्पणाची भावना तर आहेच शिवाय मानवी विचारांची गुंतागुंत, शहाणपण, नजाकत, संवेदनशीलता आणि कणव यांचे जीवनात खरोखरच काय महत्त्व आहे हे यातून समजतं.
साधारण साठीत समाजशास्त्र व मानसशास्त्राचे प्रोफेसर मॉरी श्वार्त्झ यांना दम्याचा त्रास सुरू झाला. साधा श्वास घ्यायला त्यांना कष्ट होऊ लागले. एक दिवस अचानक त्यांचा श्वास घुसमटला. त्यांना हॉस्पिटलमध्ये ताबडतोब हलवण्यात आलं. अॅड्रेनॅलिनच्या इंजेक्शनमुळे त्यांना त्या दिवशी बरं वाटलं. अशीच काही वर्षं लोटली. आता तर त्यांना चालतानाही त्रास होऊ लागला. एका मित्राच्या वाढदिवशी सुरू असलेल्या पार्टीत ते अचानक कोसळले. असंच काही दिवसांनी थिएटरच्या पायऱ्या उतरत असताना ते पडले. पाहता पाहता लोक जमा झाले.
स्वतःच्या शरीरांतर्गत घडामोडींशी निकटपणे जोडलेल्या मॉरी यांना काही वेगळीच शंका आली. हे केवळ येऊ घातलेल्या वार्धक्याचं चिन्ह नव्हतं हे त्यांना मनोमन जाणवलं. आताशा त्यांना सतत थकवा जाणवत असे, रात्री झोप लागत नसे, अनेक तपासण्या झाल्यावर रोगनिदान झाले. मॉरी यांना एएलएस म्हणजेच अॅमिओट्रॉफिक लॅटरल स्क्लेरॉसिस किंवा लू गेरिग डिसीज झाला असल्याची बातमी डॉक्टरांनी दिली. एकूणच चेतासंस्थेवर कठोर घाला घालणारा हा अक्षम्य रोग होता. त्यावरचे उपचार उपलब्ध नव्हते.
माॅरी यांच्याकडे आयुष्याची जेमतेम दोन वर्षे बाकी राहिली होती.
स्वतःच्या मृत्यूकडे त्यांनी अंतिम प्रकल्प म्हणून पाहायला सुरुवात केली. इथून पुढे त्यांच्या प्रत्येक दिवसाचा तो केंद्रबिंदू असणार होता. प्रत्येकालाच मरायचं असतं. अशा परिस्थितीत, त्या रोगामुळे भोगावा लागणारा मृत्यूपूर्व अनुभव इतरांसाठी मोलाचा ठरणार होता. त्यावर संशोधन होऊ शकण्यासारखं होतं. मानवी पाठ्यपुस्तकच म्हणा ना. अत्यंत सावकाश होत जाणाऱ्या माझ्या या मृत्यूचा अभ्यास करा. सारं कसं घडत आहे ते नीट पाहा. माझ्या बरोबरीने तुम्हीसुद्धा शिका. जीवन आणि मृत्यू या दरम्यानचा हा शेवटचा पूल चालताना मॉरी प्रत्येक गोष्टीचं वर्णन करणार होते.
एका पत्रकाराने माॅरी यांच्यावर वृत्तांत लिहिला. शिर्षक दिले.
एका प्राध्यापकाचा शेवटचा अभ्यासक्रम: स्व-मृत्यू. हा लेख बीबीसी टिव्ही पर्यंत पोहोचताच बीबीसी चे टेड कोप्पल यांनी माॅरींची मुलाखत घेतली. त्यांचे माजी विद्यार्थी मिच अॅॅॅॅॅॅॅॅल्बम यांच्या बघण्यात येताच त्यांनी सातशे किलोमीटर प्रवास करून लगेच माॅरींची भेट घेतली. आपल्या लाडक्या विद्यार्थ्याला भेटण्याचा आनंद माॅरी लपवू शकले नाही. गुरु शिष्याने आता प्रबंध लिहायला सुरुवात केली. ते जेंव्हा काॅलेजात होते तेव्हा दर मंगळवारी त्यांचा क्लास असायचा म्हणून आयुष्याच्या शेवटच्या प्रबंधासाठी त्यांनी मंगळवार निवडला. त्या दिवशी एक एक विषय घेऊन ते गप्पा मारायचे. जग, स्वत:ची किव, पश्चात्ताप, कुटुंब, भावना, वार्धक्याची भिती, लग्न, संस्कृती, क्षमाशीलता, अशा वेगवेगळ्या विषयांवर ते चर्चा करायचे. यातून मृत्यू हा विषयही सुटला नाही.
प्रत्येक आठवडागणीक माॅरींची प्रकृती ढासळत होती. शेवटी शेवटी श्वासोच्छवास घेणं आणि अन्न गिळणं या दोन क्रिया वगळता जवळपास प्रत्येक गोष्टीकरता आता ते इतरांवर अवलंबून होते. पुष्कळदा खोकल्याची उबळ आली की ऑक्सिजन द्यावा लागायचा. अशा विपरीत परिस्थितीतही सकारात्मक राहणं त्यांना कसं जमतं हा प्रश्न विचारल्याशिवाय मिच ला राहवलं नाही.
“असं वाटतं की मी पुन्हा मूल झालो आहे. कुणीतरी आंघोळ घालतंय, उचलून घेतंय, कोरडं करतंय, भरवतय.. या सगळ्याचा आनंद कसा घ्यायचा हे नव्याने आठवणं इतकंच काय ते मी करतो." हे माॅरीचं उत्तर होतं.
प्रचंड सकारात्मकतेने आयुष्याकडे बघण्याची नवी दृष्टी देणारं
हे पुस्तक १९९७ साली प्रकाशित झालं (मॉरी यांना त्यांची वैद्यकीय बिलं भरण्यास हातभार लागावा एवढ्याच उद्देशाने तेव्हा हे पुस्तक लिहिलं गेलं होतं). ग्रेड स्कूल्स, हायस्कूल्स आणि जगभरच्या कॉलेजेसमध्ये या पुस्तकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. मॉरी यांच्या हयातीत हे झालं असतं तर ते फारच सुखावले असते. या संदर्भात टीव्हीवर चित्रपट तयार करण्यात आला. याचं नाट्य रूपांतर सातत्याने दाखवलं जातं. मॉरी यांची सूज्ञता त्याद्वारे स्टेजवर आणि स्क्रीनवर सातत्याने सजीव आणि सचेत ठेवली जात आहे.
ट्युजडेज् विथ मॉरी हे पुस्तक जवळपास सर्व भाषांमध्ये प्रकाशित झालेलं आहे.
खूप छान लिहिले आहे,
ReplyDeleteआणि वाचनासाठी नवीन पुस्तकाची भर...